पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात 2019 मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.
प्रणव प्रकाश शिंदे ( 23, सध्या राहणार कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व तपास पथकातील स्टाफ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस कर्मचारी बापु खुटवड व महेश मंडलिक यांना खबर मिळाली होती. त्यानूसार सहकारनगर पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी येणार होता.
ही खबर वरिष्ठांना कळवून तातडीने जर्मन बेकरीजवळ सापळा रचण्यात आला. तेथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आरोपीस प्रणव असा आवाज दिला असता, पोलिस असल्याची चाहूल लागल्याने तो पळून जाऊ लागला. मात्र त्यास थोड्याच अंतरावर पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवा बापू खुटवाड, विजय मोरे, पोलीस नाईक सतिश चव्हाण , प्रकाश मरगजे, मनोज निर्मळे,भुजंग इंगळे, संदीप ननवरे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सचिन फुंदे, प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने केली आहे.
आरोपी शिंदे याचे वडिल माजी पत्रकार आहेत. ते पत्नीपासून विभक्त रहातात. त्यांना भेटायला आरोपी अधून मधून येत असतो. तो वडिलांना भेटायला आल्यावर त्यांच्या शेजारच्यांनी त्याच्या वडिलांबद्दल वाईट शेरेबाजी केली होती. याचा राग मनात येऊन आरोपीने शेजारच्या व्यक्तीवर वार करुन पलायण केले होते.