कराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

कराड: पुणे- बंगळूर महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. मंगळवारी दि. 22 रोजी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, दुचाकीला धडक देऊन अज्ञात वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.

सुरज संजय चौगुले (वय २३, रा. जखीणवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गंभीर जखमीचे नावे समजू शकले नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुरज चौगुले व अन्य एकजण दुचाकीवरून कराडच्या दिशेने निघाले होते. पुणे- बंगळूर महामार्गावर कृष्णा रुग्णालयासमोर उड्डाणपूलावर ते आले असता पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही महामार्गावर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिक व युवकांनी जखमींना रुग्णालयात हलवलं. मात्र, सूरज चौगुले याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे कर्मचारी व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.