‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’

मुंबई: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे. आदरणीय पवार साहेब व राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या सभांना महाराष्ट्राने दिलेला प्रतिसाद पाहिला तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने महाराष्ट्राचा कौल आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पण ओपिनिअनपोल असो वा एक्सिट पोल यामध्ये जाणीवपूर्वक पक्षाला कमी जागा दाखवून एकच बाजू वरचढ आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे पोल दाखवून लोकांच्या मनाची तयारी करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. हे सर्व पाहून ‘डाल में कुछ तो काला है’ असे वाटू लागते. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण होते, असेही पाटील म्हणाले.

जनतेची शंकारहित निवडणूक व्हायला हवी. मात्र तसे सध्या होताना दिसत नाही. निवडणुकीनंतर आता अनेकजण पुढे येऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करु लागले आहेत. अशावेळी सत्तारुढ पक्षाने पुढे येऊन जनतेच्या शंकांचे निरसन करायला हवे. एखाद्या वरुन आलेल्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाची माणसे वागतात. जनतेच्या मनातील शंका दूर करण्याचे काम मात्र ते करत नाहीत. जर या सर्व बाबींचा निकाल लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात निश्चित प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचा पक्ष म्हणून जिंकून येईल याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.