– हिमांशू
रस्ता शांत आहे. दुकाने बंद आहेत. रहदारी जवळजवळ नाहीच. क्वचित एखादं दुकान उघडं आहे. रस्त्यावर इतस्ततः कचरा पसरलेला आहे. शाळेत ओणवे उभं राहण्याची शिक्षा देतात तसा एखादा तरुण कमरेत पूर्ण वाकून स्तब्ध उभा आहे. पुढच्या कोपऱ्यावरही दोघेजण असेच ओणवे उभे आहेत. एखादा तरुण दुकानाच्या बंद शटरचा आधार घेत पुतळ्यासारखा उभा आहे. कुठेतरी दोन तरुण आणि एक तरुणी एकमेकांसमोर थकल्यासारखे खाली माना घालून निश्चल उभे आहेत. तिघांपैकी कुणीच कुणाशी बोलत नाहीये… जणू तिघांनी एकमेकांना “स्टॅच्यू’ केलंय. पुढे गेल्यावर एखाद्या ठिकाणी दोघे-तिघे “तर्र’ होऊन पडले आहेत.
बऱ्याच बंद दुकानांच्या समोर अशाच तरण्याताठ्या व्यक्ती लोळत पडलेल्या दिसत आहेत. त्यात काही तरुणी आहेत. त्यांना अस्तव्यस्त झालेल्या कपड्यांचंही भान नाही. जवळच्याच इमारतीतील ऑफिसमध्ये कामासाठी कुणीतरी आला आहे. परंतु जिन्यावरून त्याला वर जाता येत नाही, कारण जिन्याच्या पायऱ्यांवर एक-दोघे माना खाली पाडून झिंगत बसलेत. रस्त्यावर ओणवे उभे राहिलेल्यांपैकी एकेकजण ढेपाळून खाली पडतोय. पाहावं तिकडं असेच तरुण-तरुणी दिसताहेत. कोणतीही हालचाल न करणारी त्यांची शरीरं जणू जिवंत मुडदेच झालेत. हे दृश्य आहे युद्धांवर अब्जावधी डॉलरची उधळपट्टी करणाऱ्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशातलं… अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया शहरातलं!
इतक्या मोठ्या संख्येने हे “जिवंत मुडदे’ कसे काय दिसू लागले? केवळ फिलाडेल्फियातच नव्हे तर जगातल्या अनेक शहरांमध्ये असे खाली झुकून निश्चल उभे राहिलेले तरुण दिसू लागलेत आणि चिंतेची बाब अशी, की त्यांची संख्या वाढत चाललीये. याला कारणीभूत ठरलंय “झायलाजिन’ नावाचं ड्रग. अमेरिकेत रस्त्यावरसुद्धा जे सहजपणे मिळू शकतात, अशा अंमलीपदार्थांना “स्ट्रीट ड्रग्ज’ म्हणतात. झायलाजिन हे त्यापैकी एक. वास्तविक हे जनावरांसाठी तयार केलेलं औषध आहे. विशेषतः घोड्याला बेशुद्ध करण्यासाठी (हॉर्स ट्रॅंक्विलाइजर) म्हणून या औषधाचा उपयोग केला जातो. अफीमची जोड देऊन या ड्रगची नशा तरुणांकडून अनेक ठिकाणी सर्रास केली जात आहे.
या ड्रगच्या ओव्हरडोसमुळं अनेकांना प्राण गमवावे लागलेत. परंतु एकदा नशा केल्यावर प्राणांची पर्वा उरतेच कुठे? हे ड्रग घेतल्यावर तरुण ओणवे होऊन निश्चल उभे राहिलेले का दिसतात? हळूहळू ते खाली-खाली झुकत जातात आणि रस्त्यावर लोटांगण घालतात. असं का घडतं? यामागचं कारण काही तज्ज्ञांनी विशद केलंय. त्यांच्या मते, हे ड्रग घेतल्यावर शरीरातले स्नायू हळूहळू शक्तिहीन होतात. अखेर माणूस जमिनीवर लोळण घेतो.
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर आणि इतर रसायनांवर जितके निर्बंध घालावेत, तितके नवनवीन पदार्थ शोधून काढले जातात, ही खरोखर चिंतेची बाब आहे. आपल्या देशातसुद्धा काही उग्र औषधांपासून व्हाइटनरपर्यंत अनेक पदार्थ नशेसाठी वापरले जातात. जगभरात या बाबतीत शौकिनांनी लावलेले “शोध’ भारतात पोहोचायलाही वेळ लागत नाही. आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या तंत्रज्ञानापासून मानवी शरीराला जिवंत मुडदा बनवणाऱ्या घातक अंमलीपदार्थांपर्यंत असंख्य धोके आपल्या आसपास घोंगावू लागलेत; पण दुर्दैवानं हे विषयच चर्चेत नाहीत!