Abhishek Ghosalkar Shot Dead : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली. हा प्रकार कसा घडला याबाबतची सविस्तर माहिती एका प्रत्यक्षदर्शी महिलेने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे.
वृत्तवाहिनीशी प्रत्यक्षदर्शी महिलेने बोलताना म्हणाली, आम्हाला दुपारी ३ वाजता फोन आला की सर्व महिलांनी कार्यालयात या. गणपत पाटील नगर येथे शिवसेनेचे कार्यालय आहे. तिथे आम्हाला बोलावलं होतं. पण आम्हाला का बोलावलं आहे, हे माहीत नव्हतं. तिथे आम्ही दोन तास बसलो. मग आम्हाला आयसी कॉलनीच्या शाखेत बोलावलं गेलं. तिथंही आम्ही दीड तास बसलो. तिथे गेल्यावर कळलं की मॉरिस महिलांना साड्या देणार आहे. पण तिथे दोन मिनिटांसाठी अचानक लाईट्स गेले. त्यावेळी आम्ही शाखेत बसलो होतो, तर मॉरिस बाहेर उभा होता.
त्या पुढे म्हणाल्या की, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. शाखा आणि मॉरिसचं कार्यालय जवळ आहे. पण पुन्हा ते शाखेत आले. पुन्हा मॉरिस म्हणाले की मुलाखत घ्यायची आहे, कार्यालयात या. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर प्रवीण नावाचा कार्याकर्ताही गेला. तो भाईंना (घोसाळकर) बोललाही की काय जायचं? पण तरीही घोसाळकर तिथे गेले. थोड्याच वेळात प्रवीण बाहेर आला आणि म्हणाला भाईला (घोसाळकर) गोळी मारली. गोळी मारल्याचं कळताच सर्व बायका पळाल्या. त्यांना वाचवायला कोणीच पुढे येईना. प्रवीणने त्यांना धरून बाहेर आणलं. मग आम्ही त्यांना धरून रिक्षापर्यंत नेलं. परंतु, एकही रिक्षाचालक रुग्णालयात जायला तयार होत नव्हता. अखेर एका रिक्षावाल्याला आम्ही तयार केलं आणि रिक्षातून आम्ही करुणा रुग्णालयात त्यांना नेलं.
“आधी त्यांना रुग्णालयात न्या, मग मारेकऱ्यांना शोधा असं मी त्यांना म्हणत होते. पण मॉरिस कुठे पळाला हे कळलं नाही. त्या रस्त्याला अंधार असतो त्यामुळे काही दिसलं नाही”, असेही त्या महिलेने सांगितले. दरम्यान, या गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याचा मृत्यू झाला तर, मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.