सातारच्या अभिजित वाईकर यांना अभिनयाचे पारितोषिक

हिंदी राज्य नाट्य स्पर्धा; “लागा चुनरी में दाग’ नाटकातील “हरी शर्मा’ची भूमिका

सातारा – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या हौशी हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत यंदाच्या अंतिम फेरीत सातारच्या अभिजित वाईकर यांना “लागा चुनरी में दाग’ या नाटकातील “हरी शर्मा’ या भूमिकेसाठी अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हौशी मराठी, व्यावसायिक मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग नाट्य स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका मीनल जोगळेकर, अधिकारी मच्छिंद्र पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशांत जोशी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते अरुण नलावडे, डॉ. शरद भुताडिया, प्रमोद पवार, भालचंद्र कुलकर्णी, पवन खेबुडकर, संजय हळदीकर, अविनाश नारकर, ऐश्‍वर्या नारकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

रशियन लेखक अँटोन चेकॉव यांच्या “अ डे ऑफ गव्हर्नमेंट क्‍लार्क’ या लघुकथेवरून अभिजित वाईकर यांनी लिहिलेल्या “एके दिवशी काय झाले’ या मराठी दोन अंकी नाटकाचा हिंदी अनुवाद राजेंद्र थिटे यांनी ‘लागा चुनरी में दाग’ या नावाने केला आहे. या नाटकाला प्रेक्षक व परीक्षकांनी दाद दिली.

नाटकातील “कॉमन मॅन’ अभिजित वाईकर यांनी रंगवत पारितोषिक मिळवले.
या आधी अभिजित वाईकर यांनी हौशी मराठी नाट्य स्पर्धेत 2012 मध्ये त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या “नजरकैद’ नाटकातील “जॉय डिसूझा’ या भूमिकेसाठी आणि 2014 मध्ये “एके दिवशी काय झाले’ या नाटकातील “ह. ना.’ या भूमिकेसाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळवली आहेत. यंदा त्यांनी हिंदीत पहिल्यांदाच पारितोषिक मिळवले आहे.

या नाटकात शिल्पा वाईकर, संजीव आरेकर, उदय टंकसाली, सुनील स्वामी, तृप्ती शहा- गुजर, डॉ. प्रिया भोईटे, अतुल नानोटकर, तन्मय राजे, प्रतीक पवार, कुमार डोईफोडे, शलाका लाहोटी, सुनंदा वाईकर, किशोरी क्षीरसागर, सबनीस आढाव, वनराज कुमकर, मयुरेश आरेकर, वैष्णवी आरेकर, करिष्मा शिकलगार, बलराम कलबुर्गी, मधुमिता वाईकर आदींनी भूमिका केल्या.

या यशाबद्दल अभिजित यांचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अभिनेते रमेश कदम, चंद्रकांत देवरुखकर, नंदा निकम, सौ. शिल्पा चिटणीस, अनंत वाईकर, गुलाब पठाण, प्रदीप लोहार, यश शिलवंत, शेखर हसबनीस, अशोक उतेकर, महेंद्र पवार, अभय देवरे, पद्मनाभ जोशी, पूजा कदम, प्राजक्‍ता चव्हाण, अमेय पंडत व रंगकर्मींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)