मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची न्यायालयाकडून सशर्त जामीनावर सुटका झाली. मात्र काल नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. यामध्ये महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे.
बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनाच थेट आव्हान दिले आहे “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
“राणा चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केले. त्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
“राणा दाम्पत्य अशी निवडणूक लढणार नाहीत. कारण ते कधी आरक्षणाची गोष्ट करतात, कधी मागासवर्गीयांवर अन्यायाचा मुद्दा उपस्थित करतात. जाती धर्माची नावं घेऊन राजकारण करणं सोपं आहे. राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत. त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,” असं मत अब्दुल सत्ता यांनी व्यक्त केलं.
अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिमंडळात महसूल सारख्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्री केलंय. आता रावसाहेब दानवे यांनी रेल्वे खात्याच्या माध्यमातून दिल्ली सरकारकडून महाराष्ट्रासाठी झुकतं माप द्यावं, मी महसूल मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा कमी पडेल त्या त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.