नवी दिल्ली – उत्तराखंडमधील अनेक रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रुडकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळाले असून त्यामध्ये लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुडकी, ऋषिकेश, हरिद्वार रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासह अनेक धार्मिक स्थळांनाही बॉम्ब स्फोटाने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे.
हिंदीत लिहिलेले हे पत्र ज्या व्यक्तीने पाठवले आहे, त्याने स्वत:चे वर्णन जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असे केले आहे. पत्र मिळाल्याची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास सुरुवात केली आहे.
पत्र पाठवणारा व्यक्ती हा मानसिक आजारी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती गेल्या 20 वर्षापासून धमकी देत आहे. असे असतानाही उत्तराखंड पोलिसांनी हे पत्र गांभीर्याने घेत संपूर्ण राज्यात पाळत वाढवली आहे. धमकीच्या पत्रात नोंदवलेल्या या रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त राज्यातील प्रमुख मंदिरे आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. पोलिस यापूर्वी मिळालेल्या अशा धमकीच्या पत्रांचा या पत्राशी संबध आहे का याचा तपास करत आहेत.