लांबी (पंजाब) – आम आदमी पार्टीचा पंजाबशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांनी टीका केली आहे. संपूर्ण बादल कुटुंबीयांसमवेत मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
“आप’चा पंजाबशी काही संबंधही नाही आणि पंजाबमध्ये या पक्षाचे कोणीही सहानुभूतीदारही नाहीत. पंजाबमध्ये किती आणि कोणकोणते जिल्हे आहेत, हेदेखील त्यांना माहिती नाहीत, असेही बादल म्हणाले.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी “यूपी-बिहारी’संदर्भात केलेल्या वक्तव्यावर “आपण अन्य राज्यांबाबत जसे वागतो, तसेच वर्तन आपल्याबरोबरही केले जाईल,’ अशी प्रतिक्रिया बादल यांनी दिली.
आपल्या कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र असल्याबद्दल बादल यांनी समाधान व्यक्त केले. अन्य पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यास पक्ष सोडून दिला जातो. आम्ही गेल्या 3 ते 5 पिढ्यांपासून अकाली दलासोबत आहोत. या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र आम्ही साथ सोडली नाही, असेही बादल म्हणाले. अकाली दल-बसपा आघाडीला पंजाबमधील निवडणुकीत किमान 80 जागा मिळतील, असा विश्वास सुखबीर सिंग बादल यांनी व्यक्त केला आहे.