लोकसभा निवडणुकीत मोदींनंतरचे स्थान मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली – देशातील सगळ्यांत मोठ्या राज्यात अर्थात उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याची किमया योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे पक्षातील वजन तर वाढणार आहेच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ते सर्वात शक्तीशाली नेते म्हणूनही ओळखले जातील.
दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो. येथे लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळेच तर साऱ्याच पक्षांनी उत्तर प्रदेशासाठी आकाशपाताळ एक केले. मात्र, येथे जादू चालली ती फक्त योगी आणि मोदी यांची. मोदी यांच्या प्रतिमेचे जितके श्रेय या विजयासाठी घेतले जाईल. तितकेच श्रेय योगींनाही द्यावे लागेल. त्यामुळे ते भाजपमध्ये एक शक्तीशाली नेते म्हणून उदयास आले आहेत.
मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म पूर्ण केल्यावर पुन्हा सत्तेवर येण्याचा पराक्रम करणारे योगी 1985 नंतरचे उत्तर प्रदेशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच योगींचा कारभार एकाधिकारशाहीचा असल्याची टीका केली जाते. योगींच्या मागेही कौटुंबिक जबाबदारी नाही. मोदींप्रमाणेच योगींची कार्यपद्धती कठोर असल्याचे मानतात. मोदी चार वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. योगी उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेत. मोदींसारखीच योगींची पक्ष आणि संघटनेवर पकड आहे.
उत्तर प्रदेशमध्ये असे म्हटले जायचे की, जो मुख्यमंत्री नोएडाला जातो तो पुन्हा कधी सत्तेत येत नाही. मात्र, या अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी केले. ते 23 सप्टेंबर 2017 रोजी नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते अनेकदा नोएडाला गेले. विशेष म्हणजे येथील सर्कीट हाऊसमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यापूर्वी 16 वर्षे इतके कोणताही मुख्यमंत्री थांबला नव्हता. या स्थानाला सारे मुख्यमंत्री अशुभ मानायचे. मात्र, योगींनी या अंधश्रद्धेला मूठमाती दिलीच. शिवाय ते पुन्हा सत्तेतही आले.