नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या उमेदवार रेखा गुप्ता यांचा एकतर्फी पराभव केला. यामुळे दिल्लीच्या महापालिकेवर गेली पंधरावर्ष असलेली सत्ता आज अधिकृतपणे संपुष्टात आली आहे.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करून आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले असतानाही त्यांना अजून पर्यंत आपला महापौर बनवता आला नव्हता; या आधी तीन वेळा महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेली महापालिकेची बैठक उधळली गेली होती.
दिल्लीच्या उपराज्यपालांनी या महापालिकेत दहा जणांना नगरसेवक म्हणून नियुक्त केले होते व त्यांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. याच मुद्द्यावरून महापालिकेची सभा प्रत्येकवेळी वादळी ठरली होती. शेवटी या प्रकाराच्या विरोधात आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निर्णय देत नामनिर्देशित नगरसेवकांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्णय दिला. त्यानुसार आज मतदान घेण्यात आले. आपच्या निर्वाचित उमेदवार शैली ओबेरॉय यांना 150 मते मिळाली तर रेखा गुप्ता यांना 116 मते मिळाली.
#मंत्रिमंडळनिर्णय : शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा देणार आनंदाचा शिधा, कधी व का ? वाचा सविस्तर….
दिल्ली महापालिकेच्या एकूण 250 जागा आहेत. त्यात आम आदमी पक्षाच्या 134 जागा निवडून आल्या होत्या तर भाजपच्या 106 जागा निवडून आल्या होत्या. तथापि या महापालिकेत दिल्लीतील 10 खासदार, 14 आमदार, यांनाही मतदान करण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी बहिष्कार घातला होता.