नवी दिल्ली – दिल्लीतील शाहीन बाग परिसरामध्ये १ फेब्रुवारी रोजी कपिल गुज्जर नामक एका युवकाने गोळीबार केला होता. या घटनेनंतर शाहीन बाग परिसरात तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी या युवकाला ताब्यात देखील घेतलं होतं. दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरु असून येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतानाच व्हिडीओ देखील चित्रित केला होता.
या चित्रफितीमध्ये सदर युवक, ‘हिंदुस्तानामध्ये हे सर्व चालणार नाही, इथं केवळ हिंदूंचेच चालेल’ अशा आशयाच्या घोषणा देताना दिसत असल्याने सदर युवक हिंदू संघटनांशी संलग्न असेल असे कयास बांधले जात होते. मात्र दिल्ली पोलिसांचे तपास चक्र फिरल्यानंतर सदर युवकाचे धागेदोरे आम आदमी पक्षाशी जुळले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश देव यांनी माहिती देताना सांगितले की, “शाहीन बागेत गोळीबार केलेला युवक कपिल याचा मोबाईल तपासल्यानंतर त्याने आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्याची काही छायाचित्र सापडली आहेत. तसेच चौकशीदरम्यान कपिल याने, वर्षभरापूर्वी वडिलांसह आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्याचे कबूल केले आहे.”
‘आप’तर्फे दिल्ली पोलिसांच्या दाव्यामागे भाजपचा रडीचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतील याची प्रचिती आल्यानेच गृहमंत्री अमित शहा दिल्ली पोलिसांना हाताशी धरून अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत’ असा थेट आरोप केला.