भुवनेश्वर : ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यात मोलमजुरी करणाऱ्या तरूणाला तब्बल दोन लाख 59 हजार रयपयांचा प्राप्तीकर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्या खात्यावरून 2013-14 मध्ये एक कोटी 47 लाखाचे व्यवहार केले असल्याचा प्राप्तीकर खात्याचा आक्षेप आहे. दारीद्रय रेषेखालील जीवन कंठणाऱ्या सोनधर गोंड या तरूणाला त्याच्या कथित बॅंक व्यवहाराविषयी काहीही माहिती नाही.
कोरापूत येथील प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे. त्यात 2013-14 मध्ये त्याने बॅंक खात्यात एक कोटी 47 लाख 82 हजार 57 रुपये जमा केले. त्याबदल्यात त्याने दोन लाख 59 हजार 540 रूपये प्राप्तीकर भरावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
उमरकोट येथे आयसीआयसीआय बॅंकेत गोंड याच्या नावाने खाते उघडण्यात आले. त्यावरून हे व्यवहार झाल्याचे प्राप्तीकर खात्याच्या नोटीशीत म्हटले आहे. अशा स्वरूपाच्या नोटीस त्याला 2014-15 पासून येत आहेत. पण अशिक्षित असल्याने त्याचे काय करायचे ते समजले नाही. त्यामुळे या नोटीशीला कधी गांभीर्याने घेतले नाही. मात्र आता नोटीस आल्यावर त्याने गावात शिकलेल्या एका माणसाला नोटीस दाखवली. त्यावेळी ही बाब त्याला समजली.
तो कमा करत असलेल्या मालकाच्या मुलाने आपले मतदान ओळख पत्र, आधार कार्ड आणि पत्ता घेतला होता. त्यानेच हे खाते खोलले असावे असा संशय गोंडने व्यक्त केला आहे. मी आयुष्यात कधीही बॅंकेची पायरी चढलो नाही. उमरकोट सोडून मी कोणत्याही गावात कधी गेलो नाही, असे गोंड यांनी सांगितले.