नवी दिल्ली – आज लोकसभेच्या सभागृहात दोन जण घुसले होते तेथे त्यांनी पिवळा व लाल धूर सोडून घोषणाबाजी केली. तसाच प्रकार सभागृहाबाहेर संसदेच्या आवारातही दोन जणांनी केला. त्या दोन जणांनाही अटक करण्यात आली असून त्यातील एका महिलेचे नाव नीलम आणि दुसऱ्याचे नाव अमोल शिंदे असे आहे.
अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. तो २५ वर्षांचा आहे. तर नीलम ही ४२ वर्षांची आहे. त्यांनी संसदेच्या आवारात तानाशाही नही चलेगी, भारत माता की जय, जयभीम जय भारत अशा घोषणा दिल्या.
या दोन जणांना पकडून घेऊन जात असताना नीलम हिने पत्रकारांना सांगितले की, ते कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत आणि विद्यार्थी आहेत. माझे नाव नीलम आहे. भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे; जेव्हा आम्ही आमच्या हक्कांसाठी आवाज उठवतो तेव्हा आम्हाला मारहाण केली जाते आणि तुरुंगात टाकले जाते. आमच्यावर अवाजवी बळजबरी केली जाते.
आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही. आम्ही विद्यार्थी आहोत. आणि आम्ही बेरोजगार आहोत. आमचे पालक मजूर, शेतकरी आणि काही छोटे दुकानदार म्हणून काम करतात. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हुकूमशाही चालणार नाही, असे ती म्हणाली.