पुणे – सन २०२३ चे माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.3४ मागे घेणे, माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने उद्या (गुरुवार दि.१४ ) पुकारलेला राज्यव्यापी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप स्थगित करण्यात आला आहे.
हा संप करण्याबाबत राज्य सरकार व संबंधितांना नोटीस दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखीला माथाडी कायदा बचाव कृती समितीची आज ( बुधवार दि. 13) दुपारी 2.30 वाजतां नागपूर विधानसभा येथे बैठक झाली. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार भाई जगताप, आमदार प्रविण दटके, जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव, माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, सहचिटणीस हनुमंत बहिरट, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख,अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार,प्रकाश पाटील, अरूण रांजणे, राजन म्हात्रे,तुषार वाडीया आदी उपस्थित होते.
या बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक ३४ स्थगित करण्याचा आणि अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना करण्यासंदर्भात मालक व कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली. त्यानुसार हा संप स्थगित करण्यात आला.