धोकादायक बागवान इमारती परिसरास नगराध्यक्षांची भेट 

कराड – येथील मंगळवार पेठेतील धोकादायक झालेल्या बागवान इमारत परिसरास नगराध्यक्षांनी लागोपाठ दोन दिवस भेट दिली. सदर इमारत मोडकळीस आली असल्याने ती कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. नगरपरिषदेने जागा मालकांना वारंवार नोटिसा बजावून सदर इमारत पाडण्यास सांगितले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर इमारत उतरवण्यास प्रारंभही केला होता. परंतू इमारतीमधील गाळेधारक न्यायालयात गेल्याने याबाबत सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शिंदे यांच्याकडे अनेक नागरीकांनी यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यामुळे नगराध्यक्षांनी या परिसरास सलग दोन दिवस भेट देवून समन्वयाने वाद मिटविण्याच्या सूचना केल्या.

या इमारतीच्या आजूबाजूस असणारा परिसर हा वर्दळीचा आहे. या परिसरामध्ये लाहोटी कन्याशाळा व नगरपरिषदेची शाळा क्रमांक 9 या दोन शाळा येत असल्याने सकाळी व संध्याकाळी प्रचंड प्रमाणात गर्दी या परिसरात होत असते. सदर इमारत धोकादायक असल्याने इमारतीच्या बाजूने बॅरीकेटस्‌ व सुचना फलक लावून लोकांना सावध केले जात होते. परंतू घरमालक व भाडेकरु
यांच्या वादात सदर बॅरीकेटस्‌ काढण्यात आल्या होत्या. नगराध्यक्षा शिंदे यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्यांचेसोबत कराड शहर वरीष्ठ पोलीस
निरीक्षक सर्जेराव गायकवाड, नगर अभियंता एम. एच. पाटील, अभियंता रतन वाढाई, बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्यासह लाहोटी कन्या प्रशालेचे शिक्षक व नगरपरिषद शाळा क्रमांक 9 चे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, घरमालक व गाळेधारक यांच्यातील वाद त्यांनी समन्वयाने मिटवून घ्यावा. यासाठी गावाला वेठीस धरु नये. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मान राखतो आहोत. परंतु घरमालक व गाळेधारक यांचे हट्टापायी जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे. कन्या प्रशालेमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलींची व पालकांची ये-जा याच रस्त्यावरुन होत असते. इमारतीच्या मागील बाजूच्या भिंतीस लागून शाळा क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट, बाथरुमची व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत या लहान मुलांना मुलींना जर काही झाले तर त्याची जबाबदारी सदरचे घरमालक व गाळेधारक यांचीच असेल.

संभाव्य दुर्घटनेपासून स्वत:चे व परिसरातील नागरीकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्याशी चर्चा करुन सदर इमारतीभोवती पुन्हा बॅरीकेटस्‌ लावण्यात आल्या.
यानंतर कन्याप्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बायस यांच्याशी चर्चा केली. सदर इमारतीच्या रस्त्यावरुन स्कूल बस आणू नये याबाबत सुचना कराव्यात. तसेच शक्‍यतो मुलींनी या रस्त्याचा वापर टाळावा याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक 9 मध्येही मुलांसाठी टॉयलेट व्हॅनचा वापर करण्याबाबत सूचना केल्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.