8 महिन्यांची चिंता मिटली : धरणसाखळीत 12.03 टीएमसी पाणी
पुणे – खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 4 हजार 250 क्युसेकने मुठा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 12.03 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला आठ महिने पुरेल इतका आहे. दरम्यान, यामुळे मुठा नदी काठोकाठ भरून वाहत आहे.
खडकवासला धरणात 1.97 टीएमसी , पानशेतमध्ये 4.90 टीएमसी, वरसगावमध्ये 4.45 टीएमसी तर टेमघरमध्ये 0.70 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला परिसरात गुरुवारी 3 मिमी, पानशेतमध्ये 29 मिमी, वरसगावमध्ये 37 मिमी तर टेमघर धरणात 95 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. बुधवारीच खडकवासला धरण 96 टक्के भरल्याने धरणाच्या कालव्यातून 500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.