साओ पावलो : जागतिक पातळीवर सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून मान्यता मिळालेल्या फुटबॉलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडू म्हणून ब्राझीलच्या पेलेचा उल्लेख केला जातो. पेलेच्या या असामान्य कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच आता ब्राझील सरकारने तयार केलेल्या शब्दकोशामध्ये पेलेच्या नावाचा समावेश एक विशेषण म्हणून करण्यात आला आहे.
कोणत्याही गोष्टीची तुलना करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा महत्त्व स्पष्ट करण्यासाठी ‘पेले’ हा शब्द आता विशेषण म्हणून वापरण्यात येणार आहे. ब्राझीलमधील प्रख्यात मायकल्स डिक्शनरीमध्ये पेलेच्या नावासमोर त्याचा अर्थ देण्यात आला असून तेथे अपवादात्मक, अतुलनीय आणि एकमेव असे शब्द वापरण्यात आले आहेत. यापुढे ब्राझीलमध्ये कोणाचा उल्लेख या प्रकारे करायचा असेल तर त्यासाठी पेले हा शब्द विशेषण म्हणून वापरता येऊ शकतो.
अशाप्रकारे पेलेचा सन्मान व्हावा यासाठी गेले कित्येक मोहीम सुरू होती. दीड लाखपेक्षा जास्त लोकांनी सह्यांची मोहीम घेऊन पेलेचा अशा अर्थाने शब्दकोशात समावेश व्हावा अशी मागणी केली होती. यापुढे ब्राझीलमध्ये कोणाचाही सन्मान करताना पेले हा शब्द विशेषण म्हणून वापरण्यात येणार आहे.
उदाहरणार्थ चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या एखाद्या कलाकाराचा सन्मान करायचा असेल तर तो चित्रपटसृष्टीचा पेले आहे. अशा प्रकारे शब्दयोजना करण्यात येणार आहे. इतर क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा क्रीडापटूंचा सन्मान करताना पेले हे विशेषण वापरण्यात येणार आहे.