पुसेगाव – जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकल्या. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलला पाच जागा मिळाल्या. बाजार समितीवर घार्गे यांनी आपले वर्चस्व पुन्हा सिध्द केले. जिल्हा बॅंकेची पुनरावृत्ती करुन आपणच खटाव तालुक्याचा किंग असल्याचे घार्गे यांनी दाखवून दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री, तसेच आजी, माजी आमदार व स्थानिक मान्यवरांच्या सहभागामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
माजी आमदार घार्गे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, धैर्यशील कदम, राहुल पाटील, रणधीरशेठ जाधव, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे, मानाजी घाडगे यांच्यासह अनेक समर्थक कार्यकर्ते खटाव तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी झटत होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलसाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते या निवडणुकीसाठी लढत होते. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी व मोठी चुरशीची बनली होती. वडूज येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे, सहाय्यक बाळासाहेब भोसले, स्वप्नील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया झाली.
खटाव तालुका विकास आघाडीचे मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्राथमिक कृषी पतपुरवठा व बहुउद्देशिय संस्था- सर्वसाधारण मतदार संघ : राहुल विठ्ठलराव फडतरे (647), महेश पतंगराव घार्गे (636), अभिजीत हणमंत देशमुख (626), ज्ञानेश्वर नारायण नलवडे (617), दत्तात्रय प्रल्हाद पवार (616), सुनील हिंदूराव फडतरे (612), विजयकुमार हरिदास शिंदे (602). महिला राखीव : सौ. लता आनंदा जगदाळे (647), सुनीता दत्तात्रय मगर (625). इतर मागासवर्गीय राखीव : दीपक बबनराव विधाते (656). विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग राखीव ः शरद आत्माराम पाटील (635), ग्रामपंचायत सर्वसाधारण : आण्णा अर्जुन वलेकर (536).
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : विनोद किसन घार्गे (545). शेतकरी सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ : अभिजित सुरेश जाधव (539). ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघ : शैलेंद्र रामचंद्र वाघमारे (544). अनुज्ञप्तीघटक व्यापारी व आडते मतदार संघ : संकेत शेखर म्हामणे (426), गिरीष शांतीलाल शहा (424). हमाल मापाडी मतदार संघ : स्वप्नील सदाशिव घाडगे (395). या निवडणकीत 206 मते अवैध ठरली. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढली.
या निवडणूकीत पुसेगाव केंद्रात खटाव विकास आघाडीला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्यामुळे पुसेगाव व खटाव जिल्हा परिषद बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.