वाई -येथील भाजी मंडईतील सकुंडे यांच्या जुन्या वाड्याला सोमवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास अचानक लाग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
मंडईच्या मध्यवर्ती भागात युवराज व रविराज सकुंडे यांचा जुना वाडा आहे. या वाड्याच्या दर्शनी भागात काही व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. खालच्या भागामध्ये सय्यद बंधूंचे गॅस वेल्डिंगचे दुकान आणि शेजारी दीपक जमदाडे यांचे कपड्यांचे दुकान आहे. त्या शेजारी किराणा मालाचे दुकान आहे. वाड्याच्या मागील भागात सकुंडे याचे कुटुंब रहात आहे. या वाड्यातून सोमवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास अचानक धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर थोड्याच वेळात आगीचे लोट दिसू लागले. काही वेळात वाडा आगीच्या ज्वाळांनी वेढला. वाईत सोमवार हा आठवडा बाजार असल्याने मंडईत प्रचंड गर्दी होती. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. हा वाडा वाई नगरपरिषदेच्या समोरच असून, या घटना घटनेची माहिती मिळताच पालिकेचा अग्निशामक बंब लगेच दाखल झाला.
गरवारे कंपनीने वाई पालिकेस दिलेला अग्निशामक बंब, पाचगणी, महबळेश्वर पालिका आणि भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याचे अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही; परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. वाड्यालगतचे व्यापारी आणि अन्य व्यवसायिकानी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. ही घटना समजताच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, कार्यालय प्रमुख नारायन गोसावी, सचिन धेंडे, सागर सरतापे, संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, विक्रांत डोंगरे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, संग्राम पवार, धनंजय हगीर, मोअज्जम इनामदार, गणेश जाधव, इरफान बागवान, जुबेर बागवान, विजय ढेकाणे, अक्रम बागवान, आमीर बागवान, प्रशांत डोंगरे, सौरभ खोपडे, भवरलाल ओसवाल, गोट्या सोनावले व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सतर्कतेमुळे
विद्यार्थी सुखरूप
ही घटना वाई नगरपालिका शिक्षण मंडळाच्या इमारतीशेजारी घडल्याने सर्वांची तारांबळ उडाली. घटनास्थळापासून सात ते आठ फुटांवर नगरपरिषद शाळा क्र. 4 आहे. वाड्याला आग लागली तेव्हा शाळा सुरू होती. वर्गातूनच आग दिसल्याने विद्यार्थी व शिक्षक घाबरून गेले होते. नागरिकांनी सतर्कता दाखवून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
===============