भोंदूला एलसीबीने ठोकल्या बेड्या
वाई (प्रतिनिधी) – बोपर्डी (ता. वाई) येथील एका दाम्पत्याला त्यांच्या नातेवाइकांनी करणी केली असल्याची बतावणी करून त्यांना 21 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी चांदवडी (ता. वाई) येथील भोंदूबाबा गणेश विठोबा शिंदे याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोपर्डी येथील मुंबईस्थित दाम्पत्याला लग्नाला बरीच वर्षे झाल्यानंतरही अपत्य होत नव्हते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय उपचार घेऊनही उपयोग होत नसल्याने गणेश शिंदे या भोंदूकडे जाण्याचा सल्ला नातेवाइकांनी दिला. त्यानंतर त्या दाम्पत्याने शिंदे याच्याकडे त्यांची सर्व कहाणी कथन केल्यानंतर त्याने “तुमच्यावर करणी करण्यात आली आहे,’ अशी बतावणी करून ती करणी त्यांच्याच घरातल्या लोकांनी केल्याने तुम्हाला त्रास होत आहे. त्यामुळे अपत्य होणार नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या या दाम्पत्याने यावर उपाय काय, असे विचारल्यानंतर भोंदूने उपाय आहे. पण त्याला खर्च असल्याचे सांगितले. त्यानंतर करणी काढण्याच्या बहाण्याने भोंदू गणेशने त्या दाम्पत्याकडून वेळोवेळी रमा घेत 21 लाख रुपयांचा गंडा घातला. त्यांनतर बरेच दिवस झाले तरी अपत्य होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दाम्पत्याने वाई पोलीस ठाण्यात भोंदूविरोधात फिर्याद दिली.
वाई पोलिसांनी फसवणूक व अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यानुसार शनिवारी गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने गणेश शिंदे याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार संतोष पवार, नितीन गोगावले, प्रमोद सावंत, सजंय जाधव यांनी केली.
भोंदूपासून सावध राहा व पोलिसांना कळवा
जिल्ह्यात अशाप्रकारे कोणी भोंदूगिरी करत असल्यास त्या लोकांच्यापासून नागरिकांनी सावध राहवे. तसेच अशा लोकांच्या भूलथापांवर विश्वास न ठेवता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.