महापालिकेने घेतली दखल नागरिकांची झाली सोय
भोसरी – महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड-19 तपासणी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नागरिकांना उभा राहण्यासाठी जागा नव्हती. किंवा रांगेत उभा राहा म्हणण्यासाठी कोणी सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे नागरिकांनी बाजारात गर्दी करावी, तशी गर्दी केली होती. त्यासंबंधीचे वृत्त दैनिक प्रभातने रविवारच्या (दि. 19) अंकात सचित्र छापले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने त्वरित येथे मोकळ्या जागेत मंडप टाकून येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे.
भोसरीमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक प्रभागात करोना सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. भोसरीत संख्या वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी येथे शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अक्षरशः सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था नव्हती की उभा राहण्यासाठी व्यवस्थित जागा नव्हती. जिथे जागा मिळेल तेथे उभा राहून तपासणी करून घेत होते. मनात अधीच करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो की निगेटिव्ह अशी शंका आहे.
शरीर प्रकृती अस्वस्थ त्यात आरोग्य केंद्रांवर व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांची होत असलेली गैरसोयीची दैनिक प्रभातने दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन सोमवारी येथे मंडप टाकून करोनाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
मागील दोन दिवसांपूर्वी येथे उभा राहण्यासाठी नीट व्यवस्था नव्हती. परंतु प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच येथे व्यवस्था निर्माण करून येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सनुसार अंतर ठेवण्यासाठी पूर्ण मंडप परिसरात पांढऱ्या कलरने गोल वर्तुळ तयार केले आहे. तसेच लोखंडी पाइप व लाकडी बांबू लावून दोन ओळीत सुरक्षित अंतर राखण्याचे काम केले आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागली असून गर्दी होत नाही. दोन नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहत असल्याने संसर्ग होणे टळणार आहे. महापालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच दैनिक प्रभातचे देखील आभार मानले आहेत.