बंगळुरू – कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्विटसाठी बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणावतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले आहेत.
वकील रमेश नाईक यांनी प्रथमश्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात कंगनाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
आपण दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास तसेच याप्रकरणी तपास करण्याचे निर्देश दिले असल्याचे वकील रमेश नाईक यांनी सांगितले. विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषीविषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला.
तसेच दिल्ली, हरियाणा या ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले होते. त्यांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना “एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना राणावत हिने मोदींच्या ट्विटला रिट्विट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना दहशतवादी असल्याचे म्हणत टीका केली होती.