नवी दिल्ली – कोविड-19 विरोधी लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांची परवानगी भारत बायोटेकने भारतीय औषध महासंचालनालयाकडे मागितली आहे. मात्र तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीपूर्वी दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीचा सर्व डाटा सादर करावा, अशी सूचना “डीसीजीआय’ने या कंपनीला केली आहे.
भारत बायोटेककडून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने “कोव्हॅक्सिन’ ही पूर्ण देशी बनावटीच्या कोविड-19 विरोधी लस विकसित केली जात आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांची परवानगी मागण्यासाठी भारत बायोटेकने “डीसीजीआय’ कडे 2 ऑक्टोबर रोजी अर्ज केला आहे.
या तिसऱ्या टप्प्यतील चाचणीमध्ये 10 राज्यांमधील दिल्ली, मुंबई, पाटणा आणि लखनौसह एकूण 19 शहरांमधील 18 वर्षांपुढील 28 हजार 500 उमेदवारांना ही लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्पातील चाचणी अद्याप सुरू असून काही ठिकाणच्या उमेदवारांना दुसरा डोसही अजून देणे बाकी आहे. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे प्रोटोकॉलबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे हंगामी डाटा “डीसीजीआय’ला सादर केला आहे.
“डीसीजीआय’च्या तज्ञांच्या समितीने तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या निकषांबाबत समाधान व्यक्त केले असून मात्र त्याबरोबर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्तीचा सविस्तर डाटाही आवश्यक असल्याचे “डीसीजीआय’ने म्हटले आहे.