सातारा -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 739 ग्रामपंचायतींनी सुमारे 17 लाख 95 हजार 602 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरेगाव तालुक्यात 100 ग्रामपंचायतींनी तीन लाख 71 हजार 910 असा सर्वाधिक दंड वसूल केला आहे.
चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम अशीच सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली. विविध प्रकारच्या कारवाईतून 19 लाख 22 हजार 231 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे फडतरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जावळी तालुक्यात 34 ग्रामपंचायतींनी 66 हजार 440 रुपये दंड, कराड तालुक्यात 46 ग्रामपंचायती एक लाख 91 हजार 150 रुपये, खंडाळा तालुक्यात 48 ग्रामपंचायती 88 हजार 503 रुपये, खटाव तालुक्यात 81 ग्रामपंचायती एक लाख 81 हजार 800 रुपये, कोरेगाव तालुक्यात 100 ग्रामपंचायती 3 लाख 71 हजार 610 रुपये, महाबळेश्वर तालुक्यात 9 ग्रामपंचायती 35 हजार 200 रुपये,
माण तालुक्यात 94 ग्रामपंचायती एक लाख 87 हजार 950 रुपये, पाटण तालुक्यात 89 ग्रामपंचायती एक लाख 75हजार 915 रुपये, फलटण तालुक्यात 64 ग्रामपंचायती एक लाख 72 हजार 216 रुपये, सातारा तालुक्यात 130 ग्रामपंचायती दोन लाख 15 हजार 962 रुपये, वाई तालुक्यात 44 ग्रामपंचायती एक लाख 8 हजार 856 रुपये दंड असा जिल्ह्यातील 739 ग्रामपंचायतींनी 17 लाख 95 हजार 602 रुपयांचा दंड वसूल केला.
दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती पहिल्यांदा आढळून आल्याने 54 हजार 620 रुपये दंड वसूल करण्यात आला. जावळी तालुका पाच हजार, कोरेगाव तालुक्यात 26 हजार 350, कराड तालुक्यात पाच हजार 550, पाटण तालुक्यात 8 हजार 500, फलटण तालुक्यात दीड हजार रुपये, सातारा तालुक्यात अडीच हजार रुपये, वाई तालुक्यात एक हजार रुपये, खंडाळा तालुका एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानांमध्ये दुसऱ्यांदा आढळून आल्याबद्दल 19 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. होम क्वारंटाइन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 41 हजार 109 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांकडून 11 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या दंडात्मक कारवाईतून 19 लाख 22 हजार 231 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे अविनाश फडतरे यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक चार लाख 35 हजार दंड वसूल
चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईच्या मोहिमेत कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी क्रांती बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींमार्फत 3 लाख 71 हजार 610 रुपयांचा सर्वाधिक दंड वसूल केला. दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास 26 हजार 350 रुपये, दुकानात पाच पेक्षा व्यक्ती दोनदा आढळून आल्यास एक हजार रुपये, होम क्वारंटाइनचे नियम व्यवस्थित न पाळल्याबद्दल 35 हजार 300 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांकडून दीड हजार रुपये असा चार लाख 35 हजार 760 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.