रेकजाविक (आईसलॅन्ड) – आईसलॅन्डमधील एका निद्रीस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील हालचालींचे संकेत मिळत असताना सोमवारी अचानक रेकजाविक गावाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. रात्रीच्यावेळी लाव्हा आकाशात उसळून जमिनीतून बाहेर पडू लागल्याचे स्थानिकांनी बघितले.
सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा उद्रेक झाला. त्यापूर्वी तासभर आगोदर या परिसराला भूकंपाचा धक्का देखील जाणवला होता. ग्रिंडाविक शहरापासून ३ तिसोमीटर अंतरावर हगाफेल येथे या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे, या ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारा लाव्हा ४ किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे, असे आईसलॅन्ड सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आईसलॅन्डमध्ये २०२१ पासून चौथ्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या शक्यतेमुळे गेल्या महिन्यातच ग्रिंडाविक आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. डोंगरमाथ्यावरून वहात येणाऱ्या अतितप्त लाव्हाच्या वाटेतील ३ हजार संख्येची वस्ती आता रिकामी करण्यात आली आहे. या परिसरातील वाहतूक देखील स्थगित करण्यात आली आहे.