जकार्ता -इंडोनेशियातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या जावा बेटावरील माऊंट सुमेररू येथील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीतून धूर आणि वाफांचे ढग बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या ज्वालामुखीमुळे आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
पूर्व जावा प्रांतातील लुमाजांग जिल्ह्यामधील या ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आजूबाजूच्या डझनभर गावांवर पसरायला लागली आहे. या ज्वालामुखीच्या प्रभावामुळे या परिसरामध्ये मोठे भूकंपासारखे हादरे जाणवू लागले आहेत.
तसेच मुसळधार पाऊसदेखील व्हायला लागला आहे. पावसाचे पाणी, तप्त लाव्हामध्ये मिसळल्यामुळे निर्माण झालेला राडारोडा वाहून जवळच्या गावात येऊ लागला आहे. या राड्या रोड्यामुळे दोन गावांना जोडणारा एक पूल नष्ट झाला आहे.
या दोन्ही गावांमधील नागरिकांना सुरक्षिततेसाठी दुसरीकडे हलवले जात आहे, असे ग्रामप्रमुखांनी सांगितले आहे. शेकडो नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित आश्रय छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. 3,676 मीटर उंचीच्या माऊंट सुमेरु येथील ज्वालामुखीचा यापूर्वी जानेवारीमध्ये उद्रेक झाला होता. मात्र त्यावेळीही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.