नवी दिल्ली – लाल समुद्रात आणि एडनच्या आखातामध्ये सागरी वाहतुकीसमोर हौथी बंडखोरांनी उभ्या केलेल्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने १० देशांच्या आघाडीची घोषणा केली आहे. इस्रायलमध्ये गेलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी या आघाडीची घोषणा केली आहे. लाल समुद्रामध्ये हौथी बंडखोरांनी एका पाठोपाठ एक मालवाहतुक करणाऱ्या जहाजांवर हल्ले केल्यानंतर ही सागरी सुरक्षा आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
इस्रायलमध्ये दाखल झाल्यानंतर ऑस्टिन यांनी इस्रायल-हमास युद्धासंदर्भात इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या युद्धाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून कायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा करणाऱ्या बिगर राजकीय गटांच्या मुकाबल्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. या बहुराष्ट्रीय ऑपरेशनमध्ये ब्रिटन, बहरीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स आणि स्पेन यांचा समावेश आहे.
येमेनस्थित हौथी बंडखोरांनी सागरी वाहतुकीला धोका निर्माण केला आहे. लाल समुद्रातील सागरी वाहतूक व्यापारी दृष्टीने महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हा एक महत्वाचा सागरी कॉरिडोर आहे, असेही ऑस्टिन म्हणाले.
एका व्यापारी जहाजाच्या मदतीला अमेरिकेच्या नौदलाचे यूएसएस कॉर्ने हे जहाज त्वरित रवाना करण्यात आले होते. स्वान अटलांटिक या जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता आणि जहाजविरोधी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील हौथी बंडखोरांकडून येमेनच्या भूमीवरून डागण्यात आले होते. त्याचवेळी कायमॅन आयलंडच्या आणखीन एका तेलाच्या टॅंकरवरही हल्ला झाला होता. हौथी बंडखोरांनी या दोन्ही जहाजांवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर लगेचच या सागरी सुरक्षा आघाडीची घोषणा करण्यात आली.
अमेरिकेच्या युद्धनौकांनाही केले गेले लक्ष्य…
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या नौदलाच्या विनाशिकेने हौथींकडून डागण्यात आलेली अनेक ड्रोन पाडली होती. तर अमेरिकेच्या युद्धनौकेवर हौथींकडून दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली गेली होती. पूर्व सीरिया आणि इराकमधील हल्ल्यांना अमेरिकेकडून प्रत्युत्तर दिले गेले आहे. इराणमधील रिहोल्युशनरी गार्ड आणि अन्य दहशतवाद्यांच्या शस्त्र गोदामांनाही अमेरिकेने लक्ष्य केले होते.