अहमदाबाद – लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे आमदार चिराग पटेल यांनी मंगळवारी पक्ष नेतृत्वाच्या राज्यातील कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त करीत विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
पक्षाच्या प्रदेश शाखेत गटबाजीचा आरोप करत ते म्हणाले की, पक्षाचे पदाधिकारी वातानुकूलित बंगल्यात बसून एक संस्थान चालवत असल्यासारखे पक्ष चालवत आहेत. कॉंग्रेस मधील इतर अनेक आमदारही नाराज असून त्यांना गुदमरल्यासारखे वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.
आनंद जिल्ह्यातील खंभात मतदारसंघाचे प्रथमच आमदार झालेले पटेल यांनी आज सकाळी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १६ वर आले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी खंभातमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश रावल यांचा जवळपास ३७०० मतांच्या फरकाने पराभव केला होता. ते भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे. गुजरात मध्ये विरोधकांच्या आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. मागच्याच आठवड्यात आम आदमी पक्षाच्याही एका आमदाराने आमदारकीचा राजीनामा दिला आहे.