जकार्ता – इंडोनेशियातील ज्वालामुखी पाहणे एका चीनी महिलेच्या जिवावर बेतले आहे. संबंधित महिला ज्वालामुखीजवळ फोटो काढत असताना त्यात कोसळली व तिचा मृत्यू झाला. आपल्या पतीसह ती इजेन ज्वालामुखीजवळ आली असताना ही घटना घडली आहे.
या ज्वालामुखीचे वैशिष्ट असे की याचा उद्रेक होताना नीळ्या रंगाच्या ज्वाळा पसरतात. शनिवारी ही घटना घडली असून हुआंग लिहोंग असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
पर्यटकांसाठी गाइडचे काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की सेल्फी काढण्यासाठी फार जवळ जाऊ नका अशा वारंवार सूचना देऊनही हुआंग नावाची ही महिला फोटो अधिक चांगला येण्यासाठी मागे मागे सरकत गेली. त्यातच ही दुर्घटना घडली.
तिचा मृतदेह दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. सल्फ्युरिक ॲसिडचे ज्वलनातून निघणारी निळी आग आणि निळा प्रकाश आदी बाबींमुळे हा इजेन ज्वालामुखी प्रसिध्द आहे.
इंडोनेशियात जवळपास १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. येथे सातत्याने वायुचे उत्सर्जन होत असले तरी निळ्या आगीमुळे आणि त्याच्या प्रकाशामुळे हा ज्वालामुखी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.