तळेगाव दाभाडे : शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींचा जिव्हाळ्याचा असलेला सण म्हणजे बैल पोळा. ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आणि याच व्यवसायाचा अविभाज्य अंग असलेला बैल. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी बैलगाडा शर्यत ही देखील मोठी रंजक असते, या शर्यतीतील व शेतात राबणाऱ्या या बैलाचे ऋण व्यक्त करायचा सण म्हणजे बैलपोळा. मावळ तालुक्यात गावोगावी मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला.
शहरी भागामध्येही बैलपोळ्याचे महत्व टिकून आहे. तळेगाव व परिसरातील पारंपरिक पद्धतीने कुंभार व्यवसाय करणाऱ्या लोकांनी ही दुकाने थाटली होती. जागेअभावी शहरी भागात जनावरे सांभाळणे शक्य नसल्याने नागरिकांनी मातीच्या प्रतिकात्मक बैलाची पूजा करून हा सण साजरा केला.
मावळातील विविध गावांमध्ये सकाळपासूनच बैलजोडी धुवून त्यांची शिंगे घासण्यात आली. बैलांच्या शिंगाला बेगड लावण्यात आली. त्यांना बाशिंग बांधून गळ्यात घुंगरे घालून सजवण्यात आले. यावेळी घरातील महिलांनी पोळीचा नैवैद्य दाखवून गावाच्या वेशीपर्यंत बैलांची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी भंडारा गुलालाची उधळण करत ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला .
बैलगाडा शोकिनांनी बैलाच्या गळ्यात चंगाळी, शिंगाना रंगरंगोटी, अंगावर आकर्षक रंगांची विविध प्रकारची सजावट, त्यावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
सर्जा-राजाला गोडाचा नैवद्य
यावर्षी मागील काही आठवड्यांपासुन पावसाने उघडीप दिली आहे. बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला. घरातील सदस्य समजल्या जाणाऱ्या या सर्जा-राजाच्या जोडीचे औक्षण करून, पूजा करण्यात ाली. त्यानंतर पुरणपोळीचा नैवद्य दाखविण्यात आला.