वाघोली- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे 48 तास उरले असताना हवेली तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. त्यामुळे बेकायदा देशी- विदेशी दारू विक्रीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणीचे सत्र संबंधित विभागाने सुरू केले आहे.
थर्टी फर्स्टला दोन दिवस शिल्लक असताना उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व हॉटेल्सवर वॉच ठेवला आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 31 रोजी पहाटे पाचपर्यंत बार तर मद्यालये रात्री एकपर्यंत सुरू राहणार आहेत.
त्यामुळे थर्टी फर्स्टच्या तयारीसाठी तरूणाई एकवटली आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा, बनावट मद्याची विक्री होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचारी तपासणी करीत आहे. सोलापूर महामार्गावर हॉटेल्स आणि बारची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई एकत्र येत आहे. त्यातून तरूणवर्ग व्यसनाच्या आहारी जात असताना जिल्ह्यासह शहरातील सामाजिक संस्थांकडून थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्याला येणारी झिंग रोखण्यासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.