जिल्हा परिषदेची अध्यक्ष सभापती निवड 4 जानेवारीला
बीड : महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची बीड जिल्हा परिषदेची अध्यक्ष-सभापती निवड येत्या 4 जानेवारीला होत आहे. यामुळे बीडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक जि.प सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती.
यात भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर अशी राजकीय खिचडी करत सत्ता समीकरण जुळवले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेच्या पराभवानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी रणनिती आखली जात आहे.
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापन करताच धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड जिल्हा परिषदेत 60 सदस्य आहेत. यापैकी 26 राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. त्यात व्हीपमध्ये 5 जण अपात्र ठरवण्यात आले आहेत.
यामुळे बहुमताच्या आकडा 27 वर आला आहे. त्यामुळे आता खरी कसोटी पाहायला मिळणार आहे. धनंजय मुंडेना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली तर मिनी मंत्र्यालय ताब्यात घेण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरले जावू शकतात. यातच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहे म्हणून बीड जिल्हा परिषदेत निर्णायक शिवसेनेच्या चार सदस्यावर कमान आहे. तसेच माजी मंत्री बदामराव पंडित कोणती भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.