पुणे – खेळाद्वारे उत्तम व्यक्तिमत्व घडते व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथे जलतरण, वॉटर पोलो व डाईविंग आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पांडकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.रुपेश थोपटे आदी उपस्थित होते.
आतंर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये 16 महाविद्यालयाच्या 15 पुरूष खेळाडूंनी व 8 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. वॉटरपोलो खेळासाठी दोन संघ व चार महाविद्यालयाचे एकूण 30 खेळाडूनी निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.
स्पर्धा यशस्वी होण्याकरिता पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ.उमेश पनेरू, सहसचिव प्रा.संतोष पाचारणे, प्रा.आशिष तळेकर, डॉ. गौतम बनसोडे, डॉ.किशोर पठारे डॉ.पांडुरंग लोहटे, प्रा. निशिगंधा पाटील, डॉ.विद्या पठारे, प्रा.रवींद्र टक्के, प्रा. मिलिंद थोरात, सुषमा तायडे, इम्रान शेख, लक्ष्मी चलवादी, अतुल बनसोडे, प्रज्ञा गमरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेमध्ये सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालय, पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय, वाघोली येथील जी.एच रायसोनी या महाविद्यालयातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. स्पर्धेच्या संयोजकाची जबाबदारी डॉ. रुपेश थोपटे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.