लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कार्ला फाटा येथे बंदोबस्त तैनात
कार्ला – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे जिल्ह्यासह मावळातील पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. परंतु अनेक पर्यटक मावळातील पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. अशी चर्चा पर्यटननगरीत सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहायक निरीक्षक निरंजन रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी बंदी असताना याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यामुळे तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक बेशिस्त पर्यटक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहन चालवत असतात. यातून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिक करत होते.
त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व उद्योजक राष्ट्रवादीचे मावळ कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या सौजन्याने भाजे लेणी, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, लोहगड, कार्ला, खंडाळा आदी पर्यटन स्थळांवर तसेच वरसोली टोलनाका, मळवली रेल्वे स्टेशन, कार्ला फाटा याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात दर शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी तालुक्यातील व मुंबई, पुणे उपनगरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. या दिवशी पर्यटकांना रोखण्यासाठी स्थानिक तरुणांनी या मोहिमेत सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी केले आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी स्थानिक तरुणांनी पोलीस हवालदार विशाल जांभळे व 02114273036/ 9823251999 या क्रमांकावर संपर्क करून आपले नाव व मोबाइल नंबर पोलीस ठाण्यात द्यावा असेही त्यांनी सांगितले.