पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत दिवे (पुरंदर) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम करण्यात येत होते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी करोना पार्श्वभूमीवर दिवे ट्रॅकवर सद्य:स्थितीत कामकाज न करण्याबाबत निवेदनानुसार वाहनांची ब्रेकटेस्ट आणि योग्यता प्रमाणपत्रासाठीच्या चाचणीचे काम स्थगीत न करता वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. येत्या काळात ही चाचणी पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या ट्रॅकवर घेण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.
परिवहन आयुक्त कार्यालयाच्या 16 जूनच्या आदेशानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. यामध्ये दिवे येथील ऑटोरिक्षा, टुरिस्ट टॅक्सी, मालवाहू वाहने, प्रवासी बसेसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामदेखील सुरू करण्यात आले. परंतु, दिवे गावाच्या सरपंचांनी करोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिवे येथील चाचणी ट्रॅकचे काम बंद करण्याबाबत निवेदन दिले होते.
या पार्श्वभूमीवर 22 जूनसाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी होऊ शकली नाही. त्या वाहनधारकांचे कामकाज स्थगीत न करता वेळापत्रकाची पुनर्रचना केली असून, संबंधित वाहनांची चाचणी सेक्टर क्रमांक सहा येथील ट्रॅफीक पार्क शेजारी असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (पिंपरी-चिंचवड) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणार आहे.
चालकांनी अपॉईंटमेंट घेतलेल्या दिवशी “उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, सेक्टर 6, मोशी प्राधिकरण’ वाहनांची तपासणी होणार आहे. त्यामुळे ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी संबंधित वाहनासह नियोजित दिवशी दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.