करोनाबाधितांची संख्या घटली; भीती अद्यापही कायम
कोथरूड – कोथरूड-बावधन परिसराला मागील तीन महिन्यांपासून करोना संसर्गाने घातलेला “विळखा’ हळूहळू सुटू लागला आहे. मागील महिन्याभरात केवळ 800च्या आसपास बाधित सापडले आहेत. मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात करोनाने घातलेल्या थैमानामुळे कोथरूडकरांच्या मनात आजही भीती असून “पुन्हा भय’ अनुभवायचे नसेल तर सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे आणि नाका-तोंडाला मास्क बांधणे ही त्रिसूत्री नागरिकांनी अवलंबणे आवश्यक आहे.
पुण्यात पहिला करोनाबाधित दि. 9 मार्चला तर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय परिसरात 23 मार्चला प्रभाग 10 मध्ये करोनाचा पहिला बाधित सापडला. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून बाहेर फिरणाऱ्यांना “काठीचा प्रसाद’ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिनाभर (दि. 25 एप्रिल) कोथरूडमध्ये एकही बाधित सापडला नाही. दि. 17 मे पर्यंत तीनही प्रभागात (दि. 10, 11 आणि 12) मिळून केवळ 9 बाधित संख्या होती. मात्र, त्यानंतर बाधित संख्या दुपटीने वाढत राहिली.
दि. 31 मे अखेरपर्यंत केवळ 39 बाधित संख्या होती. मात्र, दि. 1 ते 30 जून दरम्यान कोथरूडमध्ये तब्बल 529 बाधित संख्या वाढली, त्यानंतर 1 ते 31 जुलैमध्ये हे प्रमाण तिपटीने वाढले. तब्बल 1 हजार 627 नवीन बाधित सापडले. दि. 1 ते 30 ऑगस्टमध्ये 2 हजार 915 तर दि. 1 ते 30 सप्टेंबर या महिन्यात 2 हजार 696 म्हणजे या तीन महिन्यांत तब्बल 7 हजार 238 बाधित सापडले आहेत.
मात्र, ऑक्टोबर महिना कोथरूडकरांसाठी आणि शहरासाठी दिलासादायक ठरला आहे. त्यामध्ये कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि सफाई कर्मचारी या योद्धांचे मोलाचे सहकार्य आहे.
ऑक्टोबर ठरला दिलासादायक…
मागील तीन महिन्यांतील बाधितांची संख्या पाहिली तर धडकी भरते. मात्र, ऑक्टोबर महिना कोथरूडकरांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. दि. 1 ऑक्टोबरला कोथरूडमधील एकूण बाधित संख्या 8 हजार 186 इतकी होती. तर, आज 4 नोव्हेंबरला ही संख्या 8 हजार 938 इतकी आहे. 34 दिवसांत केवळ 752 बाधित सापडले. नक्कीच ही संख्या दिलासा देणारी असली तरी, नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे काटेकोर पालन करावे. विशेषत: दिवाळी सणामध्ये, असे आवाहन कोथरूड-बावधन क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.