पुणे – सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याला नाटकांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी पुण्यात नाटकांचे हजारो प्रयोग होतात. मात्र, यंदा करोना पार्श्वभूमीवार नाट्य व्यवसायावर मार्चपासून पडदा पडला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी नाट्यप्रेमींच्या उपस्थितीत दरवर्षी दिमाखदारपणे साजरा होणारा मराठी रंगभूमी दिन रसिकांविनाच साजरा होणार आहे.
सांगली येथे 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी “सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग करत मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. त्यानंतर आजवर मराठी नाटकांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. मात्र, यावर्षी करोना पार्श्वभूमीवर नाट्यगृह बंद आहेत.
अनलॉकमध्ये जगभरातले व्यवहार सुरू झाले. मात्र, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यवहार बंदच आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने नाट्य, नृत्य, संगीत आदी क्षेत्रांतील पडद्यावरील कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांपुढेदेखील गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मात्र, या कालावधीत नवोदित कलाकारांसह दिग्गजांनीदेखील ऑनलाइन कार्यक्रम आणि नाटकांचा पर्याय निवडला. नाट्यवाचन, एकपात्री शो, प्रेक्षकांशी लाईव्हद्वारे संवाद, अभिवाचन आदी कार्यक्रम रंगले.
आधुनिकतेचा पर्याय स्वीकारत असतानाच प्रत्येक नाट्यरसिक आणि कलाकारांना रंगभूमीवरील तिसऱ्या घंटेचे वेध लागले होते. रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्याने सांस्कृतिक क्षेत्रासाठी आशेचा किरण ठरत आहे.
दरवर्षी मराठी रंगभूमी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटकांचे विशेष प्रयोगदेखील सादर करण्यात येतात. आतापर्यंत 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनानिमित्तच्या कार्यक्रमांमध्ये खंड पडल्याचे आठवत नाही. सादरीकरणास परवानगी नसल्याने कलाकारांचीदेखील घुसमट झाली आहे. आज प्रत्येक कलाकार कला सादर करण्यासाठी आतुर आहे.
– भाग्यश्री देसाई, अभिनेत्री आणि निर्मात्या