दुबई – चेन्नई सुपर किंग्जने हैदराबाद सनरायझर्सचा 20 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. चेन्नईने ठेवलेल्या 168 धावांचे उद्दिष्ट गाठताना हैदराबादच्या संघाला निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 147 धावांपर्यंत मजल मारता आली.
जॉनी बेअरस्टो (23) आणि केन विल्यमसन (57) वगळता अन्य कोणतीही जोडी मैदानावर फार काळ टिकू शकली नाही. काही काळ हैदराबादच्या संघाला अपेक्षित धावांची गती राखणेही अवघड झाले होते. अखेरच्या काही षटकांमध्ये रशिद खान आणि विजय शंकर यांनी सुरेख फटकेबाजी करून धावांची गती वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र शार्दुल ठाकूर, सॅम करन यांच्या गोलंदाजीपुढे हैदराबादला अपेक्षित धावा मिळाल्या नाहीत. अखेरच्या षटकामध्ये ब्राव्होने अचूक गोलंदाजी करून हैदराबादचा पराभव निश्चित केला. रविंद्र जडेजा सामन्याचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, सॅम कुरेन, शेन वॉटसन, अंबाती रायडू, कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 167 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयाला संमिश्र यश मिळाले. सलामीवीर फाफ डुप्लेसीला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. त्याला संदीप शर्माने बाद केले. त्यानंतर सॅम कुरेनने शेन वॉटसन याच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात कुरेनही बाद झाला त्यावेळी चेन्नईची 2 बाद 36 अशी बिकट स्थिती बनली होती. कुरेनने 21 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची वेगवान खेळी केली. त्यालादेखील संदीप शर्मानेच बाद केले. त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. वॉटसन व अंबाती रायडू या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजंवर वर्चस्व राखत कमीत कमी धोका पत्करून खेळी केली. या जोडीने डावाच्या 14 व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लावले.
ही जोडी चेन्नईला भक्कम धावसंख्या उभारून देणार असे वाटत असतानाच सरस खेळी करत असलेला रायडू बाद झाला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. रायडू 34 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावून 41 धावांवर खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक :-
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 167 धावा. (सॅम कुरेन 31, अंबाती रायडू 41, शेन वॉटसन 42, महेंद्रसिंग धोनी 21, रवींद्र जडेजा नाबाद 25, संदीप शर्मा 2-19, टी. नटराजन 2-41, खलील अहमद 2-45). सनरायजर्स हैदराबाद – 20 षटकांत 8 बाद 147 धावा. (डेव्हिड वॉर्नर-9, जॉनी ब्रेस्टो- 23, मनिष पांडे- 4, केन विल्यमसन- 57, प्रियम गर्ग- 16, विजय शंकर-12, रशिद खान- 14, करन शर्मा-37-2, ब्राव्हो-25-2शार्दुल ठाकूर- 10-1).