गोंडा (उत्तर प्रदेश) – घरात झोपलेल्या तीन दलित बहिणींवर गोंडा जिल्ह्यात ऍसिड हल्ला करण्यात आला. त्यात सर्वात मोठी 17 वर्षीय बहीण 35 टक्के भाजली असून अन्य दोघी 12 आणि आठ वर्षांच्या मुलींना 25 व 8 टक्के इजा झाली आहे.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्या टेरेसवर झोपल्या असताना हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या तीन मुलींवर घरात झोपल्या असताना कोणत्या तरी केमिकलच्या सहाय्याने हल्ला झाल्याचे सकाळी आम्हाला समजले. आम्ही ते केमिकल कोणते याचा शोध घेत आहोत. या मुलींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयाने त्यांच्या सर्व उपचारांची सोय केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
यातील थोरल्या मुलीला सर्वाधिक भाजले आहे. आम्ही या मुलींच्या कुटुंबीयांशी बोललो आहे. त्यांचा कोणावरही संशय नाही. पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. न्यायवैद्यक पथक अणि श्वानपथकाने घटना स्थळाची पाहणी केली आहे. आम्ही यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना तातडीने शोधून काढू, असे गोंडाचे पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनी सांगितले.
तीनही बहिणी पहाटे दोनच्या सुमारास ओरडत खाली आल्या. त्या विव्हळत होत्या. आम्हाला वाटले गॅस सिलिंडरमुळे त्या भाजल्या असाव्यात. नंतर लक्षात आले हा ऍसिड हल्ला होता. नुकतेच माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या थोरल्या मुलीचे या कुटुंबाने अलीकडेच लग्न ठरवले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले
त्याच वस्तीतील हल्लेखोर?
हे गाव खूप लहान आहे. त्यामुळे त्याच वस्तीतील हल्लेखोर असावा, असा संशय आहे. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.