– संजय कडू
पुणे – राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या पुण्याभोवती अंमली पदार्थांचा विळखा आवळला जात आहे. शहराच्या झोपडपट्टीतील 16 ते 20 वर्षांच्या मुलांना हाताशी धरून हे अंमली पदार्थ पोहोचवले जात आहेत. या पेडलरची माहिती पोलिसांना आहे; पण त्यांनाही हा माल आणून देणाऱ्यांची माहिती नसल्याने याच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत. पुण्याच्या सर्व भागातच ही नशा करणाऱ्यांचे प्रमाण भयावह पद्धतीने वाढले आहे.
अनलॉकमुळे परराज्यातील नोकरदार आणी विद्यार्थीही परत येऊ लागल्यानंतर अवैध धंदे पुन्हा फोफावू लागले आहेत. अलिकडेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे पकडलेले एमडी ड्रग्ज हे अंमली पदार्थाची बाजारपेठ अनलॉक झाल्याचेच उदाहरण मानले जाते. काही वर्षापूर्वी कुरकुंभ येथील एम.डी.ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी करोडो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातही ड्रग्जच्या मार्केटची अनेक धक्कादायक सत्य उघडकीस आली आहेत.
पोलिसांचे हात पेडलरपर्यंतच
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिस वारंवार पकडतात, मात्र मुख्य आरोपी पर्यंत ते कधीच पोहचत नाहीत. मुख्य आरोपी परराज्यातून ऑनलाईन किंवा मोबाइलद्वारे ड्रग्ज विक्रीचे नियंत्रण करतो. त्यामुळे पोलीस फक्त पेडलरना पकडतात. पेडलर म्हणजेच फक्त अंमली पदार्थाचे डिलिव्हरी बॉय. त्याला आदेश देणारा कोण याची किंचितही माहिती नसते. डिलिव्हरीचे पैसे ऑनलाईन मिळतात. आदेश देणारा सूत्रधार सातत्याने मोबाईल नंबर बदलत असल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडत नाही.
पेन्सिल पॅन्ट, स्पोर्ट बाईक हीच ओळख अंमली पदार्थाची तस्करी करणारे पेडलर सराईत गुन्हेगार नसतात. सर्वसामान्य आणि आर्थिकदुष्टया मागासलेल्या कुटुंबातील तरुण असतात. तर काही पेडलर हे अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुणच असतात. त्यांचे वयही अगदी 17 ते 25 दरम्यान असते. त्यांची ओळख म्हणजे पेन्सील पॅन्ट आणी स्पोर्ट बाईक. पायाला घट्ट चिकटलेली पेन्सील पॅन्ट, त्यावर टीशर्ट, रंगीबेरंगी हेअरस्टाईल आणि वेगात स्पोर्टबाईक ही त्यांची ओळख. येरवडा, लमाणवस्ती, उंड्री, लोहगाव वस्ती आणि शहरातील झोपडपट्टीतील तरुण पेडलरचे काम करतात. त्यांना एका डिलिव्हरीसाठी हजार दोन हजार रुपये मिळतात, अशी माहिती प्रभातच्या हाती आली आहे. ही डिलिव्हरीही दोन ते पाच ग्रॅम एम.डी. ड्रग्जची असते. यामुळे अंगाची झडती घेतली तरी सहसा सापडत नाही.
नवीन पॉकेट
एकेकाळी शहराच्या मध्यवर्ती तसेच कोरेगाव पार्क व कल्याणीनगर परिसराला अंमली पदार्थाचे पॉकेट मानले जात होते. मात्र अलिकडच्या काळात हिंजवडी, विमाननगर, एनआयबीएम रोड, कोथरुड आणि उंड्री परिसर पॉकेटस बनले जात आहे.
एमडीचीच चलती
अमंली पदार्थाच्या बाजारात सध्या फक्त गांजा आणि एम.डी.ड्रगचाच गाजावाजा आहे. एकेकाळी ब्राऊन शुगरने व्यापलेल्या बाजारपेठेत सद्या ब्राऊन शुगरचे अस्तित्वच दिसत नाही. स्वस्त आणि मस्त तसेच कारवाईत सापडला तरी फारसे नुकसान होत नसल्याने गांजाविक्री मोठ्या प्रमाणात होते. तर दुसरीकडे हायप्रोफाईल सोसायटीची मागणी लक्षात घेता एम.डी. ला दुसरा पर्यायच नाही. रस्त्याने हातात घेऊन गेले तरी हा पदार्थ एमडीच असेल असे कोणीही ओळखू शकणार नाही. तसचे अगदी दोन ग्रॅमलाही साडेतीन हजार ते पाच हजार दर मिळतो. यामुळे त्याचे दोन चार डोस कसेही कोठूनही नेले तरी पकडले जाण्याची भिती नसते.