शारजा – जोफ्रा आर्चरने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मार्कस स्टोनिस, शेमरन हेटमायर, अक्सर पटेल व हर्षल पटेल यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने 8 बाद 184 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. हेयमायर खेळत असताना एकवेळ दिल्ली संघ द्विशतकी धावांच्या पुढे मजल मारेल असे चित्र दिसत होते. मात्र, आर्चरने त्यांच्या धावसंख्येला लगाम लावला.
राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार स्टिव्ह स्मिथचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दिल्लीच्या बलाढ्य फलंदाजीला सुरूंग लावला. यंदाच्या स्पर्धेत प्रचंड भरात असलेल्या दिल्लीच्या फलंदाजांना आर्चरने जेरीस आणले. त्याने सलामीवीर शिखर धवनला केवळ 5 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर पृथ्वी शॉ याने 1 षटकार व 1 चौकार फटकावून आश्वासक सुरुवात केली. मात्र, गोलंदाजाच्याच डोक्यावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात तो आर्चरकडेच झेल देत 19 धावांवर बाद झाला.
कर्णधार श्रेयस अय्यरकडूनही अपेक्षाभंग झाला. या स्पर्धेत सातत्यापूर्ण फलंदाजी केलेला अय्यर स्थिरावल्यानंतरही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंतने पुन्हा एकदा निराशा केली. तो देखील धावबाद झाला. त्यावेळी दिल्लीच्या 4 बाद 79 धावा झाल्या होत्या. यंदाच्या स्पर्धेत प्रचंड भरात असलेला मार्क स्टोनिसही आक्रमक फलंदाजी करत असतानाच बाद झाला. त्याने 30 चेंडूत 4 षटकारांची आतषबाजी करत 39 धावांची खेळी केली. तो बाद झाला तेव्हा दिल्लीची अवस्था 5 बाद 109 अशी बिकट झाली होती.
मात्र, शेमरन हेटमायरने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली व चौफेर टोलेबाजी केली. मात्र, तो देखील अनावश्यक आक्रमक फटका मारून कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 5 षटकार व 1 चौकार फटकावत 45 धावा केल्या. पण बाद होण्यापूर्वी त्याने संघाला दीडशतकी धावांची मजल मारून दिली. त्यानंतर अक्सर पटेल व हर्षल पटेल यांनी तळात केलेल्या आक्रमक फलंदाजीने दिल्लीला 8 बाद 184 अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली. आर्चरने अत्यंत अचूक गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 24 धावा देत 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 8 बाद 184 धावा. (पृथ्वी शॉ 19, श्रेयस अय्यर 22, मार्कस स्टोनिस 39, शेमरन हेटमायर 45, जोफ्रा आर्चर 3-24, कार्तिक त्यागी 1-35).