दुबई – चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी विक्रमादित्य सुनील गावसकर यांची बोलती बंद केली आहे. महेंद्रसिंग धोनी नक्की कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार, अशी उपरोधिक विचारणा गावसकर यांनी केली होती. जर चेन्नईचा संघ एकही गडी न गमावता विजय मिळवत असेल तर मग धोनीच्या फलंदाजीच्या क्रमांकावर बोलण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात फ्लेमिंगने गावसकर यांना टोला लगावला आहे.
यंदाच्या स्पर्धेत धोनीने सहाव्या व सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याला फिनिशर म्हणूनही यश आलेले नाही. त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकावर आक्षेप घेत गावसकर यांनी टीका केली होती. धोनीने कर्णधार या नात्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे, असेही मत त्यांनी मांडले होते.
मात्र, फ्लेमिंगने गावसकर यांच्यावरच निशाणा साधला. जर संघातील पहिले पाच फलंदाज सामना जिंकून देत असतील किंवा पंजाबविरुद्धच्या सामन्यात तर संघाने एकही गडी न गमावता विजय मिळवला आहे तर मग धोनीच्या फलंदाजीच्या क्रमांकावर बोलण्याची गरज नाही, असे सांगून फ्लेमिंग यांनी गावसकर यांच्यावरच पलटवार केला आहे.