पिंपरी – गेल्या आठवड्यात अधून-मधून बरसलेल्या हलक्या आणि मध्यम सरींनंतर या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पिंपरी-चिंचवडकरांनी ऋतुला कूस बदलताना पाहिले. मंगळवारची सुरुवात पहाटेच्या दाट धुक्याने झाली.
शहरातील बहुतेक भागांमध्ये धुक्याची दाट चादर पसरली होती. शहरातील उंच उंच इमारतींचे वरील मजले त्या धुक्यांवरुन डोकावत होते. पावसाळा परतीच्या वाटेला लागला की धुके हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल घेऊन येते. यामुळे लवकरच गुलाबी थंडीचे आगमन होण्याच्या शक्यतेने नागरिक आनंदात आहे.
अनाहूतपणे आलेल्या या धुक्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सकाळी जसजसा सूर्योदय होत गेला तसतशी धुक्याची ही चादर अधिक ठळकपणे दिसू लागली. हे धुके एवढे दाट होते की काही काळ सूर्यनारायणही त्याआड झाकले गेले. शहरातील वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु उंचावर पाहिले असता शहरातील उंच इमारती आणि आसपासचा परिसर मात्र त्यात हरवून गेलेला पाहायला मिळाले. तर वातावरणातही नेहमीपेक्षा थोडेसे आल्हाददायक जाणवत होते.