पुणे- मुठा नदीखालून मेट्रो भुयारी मार्गासाठी भुयार खोदण्याचे काम महिन्याभरात हाती घेतले जाणार आहे. भुयारी मार्गाचा हा दुसरा टप्पा असून कामगारांच्या उपलब्धतेनुसार याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे.
कृषी महाविद्यालयातून सुरू झालेले मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारापर्यंत झाले. नुकताच येथे “ब्रेक थ्रु’चा इव्हेन्ट महामेट्रो तर्फे तिरंगा फडकवून साजरा करण्यात आला.
यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, आता हे काम मुठा नदी खालून होणार आहे. त्यामुळे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे. परंतु, नदीच्या खाली सुमारे 28 मीटर खोल हे काम चालणार आहे. त्यामुळे नदीच्या खालून होणाऱ्या कामामुळे नदीच्या पात्राला कोणताही धोका होणार नाही. या आधीच्या कामातही अनेक इमारतींच्या खालून भुयारी मार्गाचे काम सुरू होते. त्यांना कोणताच धोका झालेला नाही.
शिवाजीनगर जिल्हा कोर्टातून आता भुयारी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊन ते फडके हौद चौकापर्यंत होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून महिन्याभरात तेही काम सुरू होणार आहे. सुमारे 650 मीटरचे हे काम असून दिवसाला सहा मीटर या प्रमाणे हे काम होणार आहे. त्याचा आराखडाही “महामेट्रो’तर्फे तयार झाला आहे.
नदीच्या खालून काम होणार याची उत्सुकता अनेकांना आहे. परंतु नदीच्या खूप खोल आपण जाणार आहोत. सामान्यत: रस्त्याच्या खाली 20 मीटर वगैरे खालून हे भुयार केले जाते. परंतु नदीच्या खाली आपण सुमारे 28 मीटर जाणार आहोत. त्यामुळे जमीनीवर काहीही असले तरी त्याचा खाली भुयारी मार्ग बनवायला अडथळा येत नाही. मेट्रोच्या कामानेही आता काही प्रमाणात गती घेतली आहे. काही कामगारांना कामावर आणण्यात आम्हाला यश आले आहे. जे स्पेशालिस्ट कामगार आहेत, की ज्यांना क्रेन किंवा अन्य जोडणीची पूर्णत: माहिती असून जे प्रशिक्षित आहेत त्या कामगारांनाही खास विमानाने आणण्यात आले आहे आणि मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे.
– हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक जनसंपर्क, महामेट्रो
……………………………..