जेजुरी -जेजुरी येथे मार्तंड देवसंस्थानच्यावतीने शंभर बेडचे करोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. करोनाचा संसर्ग तोडण्यासाठी सर्वांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी. देवसंस्थानने सुरु केलेल्या करोना केअर सेंटरचा परिसरातील रुग्णांना निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा सौरभ राव यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार संजय जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत मोहन गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, पंकज निकुडे, राजेंद्र देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी उज्जवला जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रबंध भिसे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी पूनम कदम आदी उपस्थित होते. दरम्यान जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचा भेट दिली. तेथे गंभीर रुग्णांच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचाही शुभारंभ आजपासून करण्यात आला.
मार्तंड देवसंस्थानने जेजुरीत सुरु केलेले करोना सेंटर उत्कृष्ट पद्धतीने चालवतील असा विश्वास व्यक्त करून राव यांनी करोनाच्या काळातील देवसंस्थानने केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांनी सेंटरची पाहणी करून काही सूचना केल्या. चांगल्या पद्धतीचे भोजनासह योगासने आणि प्राणायम सुरु करावेत असे सांगितले. या पुढील काळात नवरात्र, दसरा व दिवाळी हे सण घरगुती पद्धतीने व जबाबदारीने साजरे करण्याचे आवाहन राव यांनी केले.
नव्याने जेजुरीत सुरु केलेले करोना केअर सेंटर हे राज्यातील आदर्श सेंटर करण्याचा प्रयत्न देवसंस्थानच्या वतीने केला जाईल.
-संदीप जगताप, मुख्य विश्वस्त मार्तंड देवस्थान