कोपरगाव -तालुक्यात करोनाचा कहर सुरूच असून, संथ गतीने दररोज करोना मृत्यूचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे आकडे अर्धशतकाकडे, तर बाधितांचे आकडे दोन हजारांच्या दिशेने झेपावत आहेत. आतापर्यंत करोनाने तालुक्यातील 33 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल 1 हजार 8 36 व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील 129 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
दरमान, मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी 45 व्यक्ती करोनाबाधित आढळले, तर तालुक्यातील वारी येथील 60 वर्षीय महिला व शहरातील टिळकनगर येथील 60 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला आहे. तालुका करोनामुक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे. अशातच कोपरगाव नगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागातील एका अभियंत्याला करोनाची लागण झाल्याने पालिकेच्या कार्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
करोनाबाधितांच्या सेवेत 24 तास कार्यरत असलेल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याने प्रशासनाच्या वतीने पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यांना करोनाची लक्षणे असतील किंवा शारीरिक त्रास असेल, अशा कर्मचाऱ्यांची विशेष वैद्यकीय तपासणी करुन त्यांना घरी थांबण्याच्या सूचना वैद्यकीय यंत्रणेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.