आबूधाबी – शुभमन गिल आणि इयान मॉर्गन यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला. शुभमन गिल सामन्याचा मानकरी ठरला.
कोलकाताने 18 व्या षटकात तीन गडी गमावून 145 धावा करत हा सामना जिंकला. गिलने 62 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी करत नाबाद 70 धावांची खेळी केली. तर मॉर्गनने नाबाद 42 धावांचे बहुमूल्य योगदान देत संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या सनरायझर्स हैदराबादने अत्यंत संथ फलंदाजी केली. यामुळे त्यांचा डाव 4 बाद 142 धावांवर रोखला गेला.
#KKRvSRH : ठळक घडामोडी :-
- डेव्हिड वॉर्नरची खेळी व्यर्थ
- मनीष पांडे याने फटकावले अर्धशतक
- हैदराबाद संघाची मधली फळी कोलमडली
- कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकचे कल्पक नेतृत्व
- पॅट कमिन्सची गोलंदाजी ठरली निर्णायक
- आंद्रे रसेलचा कोलकाता संघात समावेश
- गोलंदाजीतील बदल कोलकातासाठी लाभदायक
नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, बेअरस्टोने निराशा केली. स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू कोलकाताचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्याचा 5 धावांवर त्रिफळा उडवला. दुसरीकडे वॉर्नर आक्रमक खेळ करत होता. तो देखील चौकार व षटकारांच्याच मागे लागला होता. एकेरी व दुहेरी धावांसाठी त्याचे प्रयत्नच दिसले नाहीत. स्थिरावला असे वाटत असतानाच 30 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावून तो 36 धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या वृद्धिमान साहा याने मनीष पांडेच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी करत संघाचे शतक फलकावर लावले.
पांडे याने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने अर्धशतकी पल्ला पार केला. त्याने 38 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावून 51 धावा केल्या. अर्धशतकानंतर तो देखील बाद झाला. साहा यानेही थोडीफार चमक दाखवली. त्याने महंमद नबी याला साथीला घेत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 30 धावांवर बाद झाला. त्याने 31 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावले.
नबी याने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला संघाला दीडशतकी धावसंख्या उभारून देण्यात अपयश आले. कोलकाता संघाने अत्यंत अचूक गोलंदाजी करत हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश राखला. वॉर्नर खेळत असताना ते मोठी धावसंख्या उभारतील असे वाटत होते. मात्र, तो परतल्यावर संपूर्ण सामन्यावर कोलकाता संघानेच वर्चस्व राखले.
संक्षिप्त धावफलक :
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 4 बाद 142 धावा. (मनीष पांडे 51, डेव्हिड वॉर्नर 36, वृद्धिमान साहा 30, महंमद नबी नाबाद 11, अभिषेक शर्मा नाबाद 2, पॅट कमिन्स 1-19, वरुण चक्रवर्ती 1-25, आंद्रे रसेल 1-16). कोलकाता नाईट रायडर्स – 18 षटकांत 3 बाद 145 धावा. (नितीश राणा 26, शुभमन गिल नाबाद 70, इयान मॉर्गन नाबाद 42, रशिद खान 1-25).