क्रिकेट काॅर्नर (#IPL) : … अन्‌ रोवली गेली आयपीएलची मुहूर्तमेढ

-अमित डोंगरे

ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल स्पर्धा अस्तित्वात आल्याचे सांगितले जात असले तरीही त्याची मुख्य कल्पना अमेरिकेतील प्रोफेशनल लीग पाहिल्यावरच या स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आला होता. या स्पर्धेला पॅकर सर्कसप्रमाणे सुरुवातीला हिणवले गेले. आयपीएल म्हणजे इंडियन पैसा लीग अशाही डागण्या दिल्या गेल्या. मात्र, याच स्पर्धेने जागतिक क्रिकेटचे आयामच बदलून टाकले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी सुरुवातीला तयार नव्हते. मात्र, आज स्पर्धेला 13 वर्षे झाल्यावर त्याचे महत्त्व लक्षात येते. हा निर्णय एकट्या ललित मोदींचा किंवा तत्कालीन पदाधिकारी जगमोहन दालमिया यांचाच नव्हे तर बीसीसीआयचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही कल्पना उचलून धरली.

मोदी यांनी 2005 साली राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयमध्ये उपाध्यक्ष म्हणून पद मिळवले. 2007 साली झालेली टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्यानंतर खरेतर आयपीएलसाठी योग्य वातावरण देशात तयार झाले. 2007 साली मोदी यांनी आयएमजी वर्ल्डचे उपाध्यक्ष अँड्य्रू वाइडब्लड यांची भेट घेतली व आयपीएलच्या संकल्पनेवर चर्चा केली. त्याचवेळी पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने मोदी यांच्यासह आयपीएल स्पर्धा सुरू होण्याचेही जाहीर केले.

या स्पर्धेसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर व मोहालीची निवड केली. फ्रॅंचायझीचा लिलाव 24 जानेवारी 2008 ला झाला. खेळाडूंचा लिलाव त्याच वर्षी फेब्रुवारीत पार पडला. पहिल्याच स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला चेन्नई सुपर किंग्जने 6 कोटी रुपयांत खरेदी केले. सचिन मुंबईचा, वीरेंद्र सेहवाग दिल्लीचा, सौरव गांगुली कोलकाताचा, व्हीव्हीएस लक्ष्मण हैदराबादचा, राहुल द्रविड बेंगळुरूचा तर युवराजसिंग पंजाबचा आयकॉन खेळाडू बनला. त्यांचा लिलाव झाला नाही तर त्यांना संघातील सर्वात महागड्या खेळाडूंपेक्षा 15 टक्‍के जास्त रक्‍कम देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानंतर सातत्याने या स्पर्धेच्या आराखड्यात बदल झाले. आज स्पर्धा 13 वे वर्ष साजरे करत आहे. या स्पर्धेइतकी तुफान लोकप्रियता जागतिक क्रिकेटलाही मिळाली नाही. आर्थिक लाभाबरोबरच मॅच फिक्‍सिंगच्याही घटना घडल्या, दोषींवर कारवाईही झाली. स्पर्धाला गालबोटही लागले. मात्र, तरीही स्पर्धा आजही नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे.

मॉरिशसच्या एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी मोदी यांनी लाच घेतल्याचे आरोप झाले व त्यानंतर मोदी यांनी देशाबाहेर पलायन केले. तेव्हापासून बीसीसीआयने आयपीएल समितीसह तसेच नव्या सदस्यांच्या मदतीने या स्पर्धेला सातत्याने नवी उंची प्राप्त करून दिली. आज देशातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडूही त्यांच्या देशाच्या संघाकडून खेळण्यापेक्षा या स्पर्धेला प्राधान्य देताना दिसतात व टीकेचे धनीही होतात. मात्र, या स्पर्धेने लाखोंना रोजगार मिळवून दिला, निवृत्त खेळाडूंना निवृत्ती वेतनही मिळवून दिले. आता येत्या काळात ही स्पर्धा केवळ भारतीय संघाच्याच नव्हे तर जगभरातील नवोदित खेळाडूंसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची प्राथमिक पायरी ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.