सासवड/नीरा(प्रतिनिधी) – रिसे (ता. पुरंदर) येथे भावजयीकडे दिराने शरीरसुखाची मागणी केली; मात्र भावजयीने त्यास नकार दिल्याने दिराने तिचा खून केला. याप्रकणी जेजुरी पोलीस ठाण्यात दिरावर गुन्हा दाखल असून तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केली आहेत.
शबीरा जैनुद्दीन सय्यद (वय 45) असे खून झालेल्या भावजयीचे नाव आहे. तर मुबारक कादर सय्यद असे फरार असलेल्या दिराचे नाव आहे. याबाबत मृत महिलेची मुलगी हसीना नासीर मुलाणी हिने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुबारक हा भावजय शबीरा यांच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता; परंतु ती नकार देत होती. सोमवारी (दि. 21) रात्री जेवण झाल्यानंतर शबीरा भांडी घासत असताना मुबारक शबीराकडे गेला व शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिल्याने मुबारकने चिडून सुरीने शबीरा हिच्या शरिरावर वार केले. यात तिचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.